माझी "लग्न म्हणजे नेमकं काय?" ही पोस्ट वाचल्यावर अनेक मित्र आणि मैत्रिणींच्या प्रतिक्रया आल्या. विशेष म्हणजे एका जवळच्या मित्राने खूपच छान प्रतिक्रया दिली.
तर एका मैत्रीणीला वेळ मिळाला नसावा म्हणून तिने मेसेज केला. एवढा वेळ काढून तिने हे वाचलं तर फोन करून निदान आभार तरी मानावेत आणि तसंही आमचं संभाषण होऊनही बराच काळ लोटला होता. फोन करायचा असं ठरवलं पण कामाच्या गडबडीत मागे पडलं. काल अचानक लक्षात आलं अन् मग सकाळपासूनच फोन करण्याच्या मोहिमेवर रुजू झाले. दोनदा फोन लावला पण तिने उचलला नाही, कामात होती कदाचित. पण थोड्या वेळाने तिचा मेसेज आला की संध्याकाळी फोन करते.
मग संध्याकाळी तिचा फोन आला. ही मनाली म्हणजे माझी खूप चांगली मैत्रीण. फार कमी वेळात आमची घट्ट मैत्री झाली. रोज एकमेकींना फोन किंवा मेसेज करतोच असं नाही पण कितीही काळानंतर भेटलो किंवा फोनवर बोललो तरी दर वेळी तितक्याच नव्हे तर कदाचित जरा जास्तच आपलेपणाने एकमेकींशी बोलतो असं वाटतं.
तर ही मनाली एक बिनधास्त मुलगी...कशाला न घाबरणारी...प्रचंड बडबडी, इतकी की समोर मूग गिळून गप्प बसलेली व्यक्ती पण बोलायला सुरुवात करेल तिला पाहून...झुळझुळ वाहणार्या पाण्याच्या झर्यासारखी, निर्मळ...तिचे आईबाबा कायम म्हणायचे, 'अगं जरा मुलीसारखी वागत जा' पण कधी जमलं नाही तिला...
पण हल्ली हीच मनाली कुठे तरी हरवून गेली आहे असं वाटत होतं अनेक दिवसापासून. विषय काढला की म्हणायची काही नाही. आज पण तशीच शांत वाटत होती. नेमकं काय चाललंय हिच्या मनात हे कळायला मार्ग नव्हता आणि तिला असं शांत बघवतही नव्हतं.
सहजच कुणा मैत्रिणीचं लग्न ठरल्याचा विषय निघाला आणि मग मनालीच्या शांततेचं गूढ उकलंल. स्वतःच बोलती झाली हळूहळू. असं वाटलं की खूप काही साचलं आहे हिच्या मनात.
मग बोलायला सुरुवात केली तिने, "खरंच खूप छान लिहिलं आहेस. बरं वाटलं हे वाचून, नाहीतर वाटत होतं की हे सगळं फक्त माझ्याच बाबतीत घडतंय. असं वाटत होतं की आपण फार नशीबवान आहोत कारण आपण सुशिक्षित आहोत, त्यामुळे आपल्या बाबतीत काही वेगळं घडेल पण असं नाहीये हेच दुर्दैव. काहीही बदललं नाही शिक्षणामुळे! फक्त नोकरी मिळविण्यास लागणारे प्रमाणपत्र इतकाच उपयोग झाला अस दिसतंय. आपल्याकडे अनेक पालक मुलींना का शिकवितात तर चांगला वर मिळावा म्हणून. तिने स्वतंत्र विचार करावा हा हेतू का नाही गं त्त्यामागे.
खरंच तुला पडलेला प्रश्न मलाही पडलाय, "लग्न म्हणजे नेमकं काय? " आणि म्हणूनच तुझी पोस्ट मी एक दोन नाही तर चक्क पाचदा वाचून काढली. खूपच मोठा विषय आहे हा आणि तसंच अनेक प्रश्न निर्माण करणारा, तरीही दुर्लक्षित. खरचंच दुर्लक्षित राहिलाय की आपणच ठेवलाय?
स्त्री-भ्रूण हत्या होते म्हणुन आपण बर्याचदा ओरडतो कधी तर जिच्या भ्रूणाची हत्या होते त्या स्त्रीला बोलून मोकळे होतो की एक स्त्री असूनही स्त्री-भ्रूण हत्या घडू देते. स्त्रीला निसर्गाने इतकं संवेदनाशील बनवलं आहे की कुठलीही स्त्री स्वतःच्या अंशाला संपवायला इतकी सहज तयार होईल?
तिलाही वाटत असेल ना की माझ्या मुलीला जन्म द्यावा. पण ती इतकी निर्दयी का होत असेल याचा कुणी विचारच करत नाही. एकदा तिच्या मनात डोकावून बघा, काय होत असेल तिची अवस्था अशावेळी...कल्पना करणं देखील अवघड आहे मग किती बळ लागत असेल हे सगळं पचवायला.
भ्रूभ्रूणहत्येचंही कारण लग्न या प्रथेत दडलंय असं नाही का वाटत? कुठल्या आईला वाटत असेल की माझ्या मुलीने या जगात जन्म घ्यावा आणि माझ्या वाट्याला आलेले सगळे भोग थोड्या वेगळ्या पद्धतीने तिच्याही वाट्याला यावेत...
पुन्हा मुलीला वाढवणं तेही आजच्या काळात किती अवघड! किती दूषित झालंय सगळं वातावरण. प्रत्येक दिवशी स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्यांमध्ये वाढच होत आहे. मग अशा परिस्थितीत मुलीला डोळ्यात तेल घालून वाढवायचं, अनेक वाईट नजरांपासून जपायचं, ती घराबाहेर पडताच काय अतिप्रसंग ओढवला जाईल याची खात्री नाही, ती घरात येईपर्यंत जीवाला घोर!
काही अतिप्रसंग ओढवला तिच्यावर तर तिच्यासोबत संपूर्ण कुटुंब कोलमडून पडतं. अशावेळी त्या मुलीला फक्त एक जिवंत प्रेत म्हणून सांभाळत रहायचे कारण तिला कोण स्वीकारणार?
परवा India's daughter बघितल्यावर तर विचारांनी नुसतं थैमान घातलं आहे डोक्यात, रात्रभर झोप लागली नाही.
आणि लग्न या प्रकाराबद्दल न बोलणंच बरं... वैतागून गेले आहे अगदी! पद्धत फक्त बदलली, पारंपरिक कांदेपोहे जाऊन आधुनिक पद्धत आली मुलगी आणि मुलगा यांनी बाहेर भेटायला लागले. पण यामुळे काय बदललं? काहीही नाही, बाकी सर्व गोष्टी जैसे थे!
बुध, गुरु, शुक्र, शनि या सगळ्यांनी पत्रिकेत इतकी गर्दी केली आहे काय सांगू तुला? मंडळाला तर फारच महत्त्व आहे. असं वाटतं की या सगळ्या ग्रहांनी खेळ मांडला आहे माझ्या आयुष्याचा! त्यात हे ज्योतिष लोक ज्यांना स्वतःच्या आयुष्यात कधी काय होईल याची कल्पना नाही, ते दुसर्यांच्या कुंडल्या मांडून त्यावर भाकीत करू लागले आहेत. काय आपण माणसं ना, किती तो अट्टाहास भविष्यात काय घडणार आहे हे जाणून घेण्याचा! बरं मुलीची पत्रिका पाहताना नुसते गुण जुळून चालत नाही. येणाऱ्या मुलीमुळे आपल्या घराची भरभराट होईल का? तिला अपत्यप्राप्ती होईल की नाही? किती ते प्रश्न! जणू अपत्यप्राप्ती होणे फक्त तिच्याच हातात आहे. पत्रिकेत 36 गुण मिळाले असून घटस्फोट झालेली जोडपी पण आहेत आणि पत्रिका न पाहता संसारसागर यशस्वी पार केलेली सुद्धा!
खरंच किती मोठी आणि भयानक गोष्ट आहे लग्न म्हणजे!
स्वतःचं म्हणजे फक्त म्हणण्यापुरतं असं आईबाबांच घर सोडून एका नव्या घरात जायचं अचानक एके दिवशी, तेव्हापासून त्या घराला आपलं म्हणायचं...प्रत्येकाचं मन सांभाळून वागायचं...आपलं काही चुकत नाही ना याची सतत काळजी! सर्वांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन जगा आणि कुठे कमी पडलो की बोल आईबाबांना.
आणि यात सगळ्यात जास्त वाईट वाटतं आईबाबांच. मुलीचे आईवडील होण आणि आयुष्यभर या गोष्टीची काळजी करत जगणं, हे आपण आईवडील होण्याआधीच अवघड वाटतंय. मुलीचे लग्न व्हावे यासाठी अनेक उंबरठे झिजवायचे, प्रसंगी मानहानी पत्करायची तयारी ठेवावी लागते. काय आणि किती सहन करावे लागते मुलीच्या आईवडिलांना हे स्वतःच्या आईवडीलांकडे पाहून कळतंय. मुलीचं लग्न होईपर्यंत ते कधी होणार या विचारात जगायचं आणि लग्न झाल्यावर मुलगी सासरी सुखी आहे का याची चिंता करीत बसायचं.
का नाही वाटणार गं आईवडिलांना मुलगी नको आपल्याला?
हल्ली तर प्रत्येक आठवड्याला एकच काम करतीये मुलांना भेटणं! लग्न हेच भारतीय स्त्रीच्या आयुष्याचं ध्येय बनवून ठेवले आहे.
जाऊदे मी बोलतच राहिले, लक्षातच नाही आलं कुठलं तरी नवीन स्थळ आणलंय त्याविषयी बाबांना बोलायचं आहे. कितीही राग आला, वाईट वाटलं तरी आईबाबांच्या समाधानासाठी सगळं चालू आहे.
दर वेळी पुन्हा नव्याने सुरुवात. तेच बोलायचं, तेच ऐकायचं, तेच प्रश्न आणि तीच उत्तरं फक्त नट वेगळा आणि कधीतरी जागा वेगळी...आणि पुन्हा नकार आला की स्वतःची, आईबाबांची समजूत काढायची.
चल ठेवते मी फोन..."
मनालीने फोन ठेवला पण डोक्यात विचारांची अजून पाखरण करून गेली..
Saturday, April 4, 2015
लग्न म्हणजे नेमकं काय?...भाग-2
Subscribe to:
Posts (Atom)