Thursday, November 26, 2015

मेहंदी

खुलला या हातावरी
रंग मेंदीचा
आज पुन्हा नव्याने
जणू आला बहर
तुझ्या माझ्या प्रीतीला 
तितक्याच नवलाईने...

शुभ्र धवल हात त्यावरी
नाजूक ती नक्षी रेखिली
त्याच रेषा तीच वळणे
साज तरी ती नवा ल्याली...

खुलत जाते मेहंदी
येई नवा रंग हातावरी
फूलू दे प्रीति तुझी माझी
अशीच जन्म  जन्मांतरी...

Saturday, April 4, 2015

लग्न म्हणजे नेमकं काय?...भाग-2

माझी "लग्न म्हणजे नेमकं काय?" ही पोस्ट वाचल्यावर अनेक मित्र आणि मैत्रिणींच्या प्रतिक्रया आल्या. विशेष म्हणजे एका जवळच्या मित्राने खूपच छान प्रतिक्रया दिली.
तर एका मैत्रीणीला वेळ मिळाला नसावा म्हणून तिने मेसेज केला. एवढा वेळ काढून तिने हे वाचलं तर फोन करून निदान आभार तरी मानावेत आणि तसंही आमचं संभाषण होऊनही बराच काळ लोटला होता. फोन करायचा असं ठरवलं पण कामाच्या गडबडीत मागे पडलं. काल अचानक लक्षात आलं अन् मग सकाळपासूनच फोन करण्याच्या मोहिमेवर रुजू झाले. दोनदा फोन लावला पण तिने उचलला नाही, कामात होती कदाचित. पण थोड्या वेळाने तिचा मेसेज आला की संध्याकाळी फोन करते.     
मग संध्याकाळी तिचा फोन आला. ही मनाली म्हणजे माझी खूप चांगली मैत्रीण.   फार कमी वेळात आमची घट्ट मैत्री झाली. रोज एकमेकींना फोन किंवा मेसेज करतोच असं नाही पण कितीही काळानंतर भेटलो किंवा फोनवर बोललो तरी दर वेळी तितक्याच नव्हे तर कदाचित जरा जास्तच आपलेपणाने एकमेकींशी बोलतो असं वाटतं.
तर ही मनाली एक बिनधास्त मुलगी...कशाला न घाबरणारी...प्रचंड बडबडी, इतकी की समोर मूग गिळून गप्प बसलेली व्यक्ती पण बोलायला सुरुवात करेल तिला पाहून...झुळझुळ वाहणार्‍या पाण्याच्या झर्यासारखी, निर्मळ...तिचे आईबाबा कायम म्हणायचे, 'अगं जरा मुलीसारखी  वागत जा' पण कधी जमलं नाही तिला...
पण हल्ली हीच मनाली कुठे तरी हरवून गेली आहे असं वाटत होतं अनेक दिवसापासून. विषय काढला की म्हणायची काही नाही. आज पण तशीच शांत वाटत होती. नेमकं काय चाललंय हिच्या मनात हे कळायला मार्ग नव्हता आणि तिला असं शांत बघवतही नव्हतं.
सहजच कुणा मैत्रिणीचं लग्न ठरल्याचा विषय निघाला आणि मग मनालीच्या शांततेचं गूढ उकलंल. स्वतःच बोलती झाली हळूहळू. असं वाटलं की खूप काही साचलं आहे हिच्या मनात.
मग बोलायला सुरुवात केली तिने, "खरंच खूप छान लिहिलं आहेस. बरं वाटलं हे वाचून, नाहीतर वाटत होतं की हे सगळं फक्त माझ्याच बाबतीत घडतंय. असं वाटत होतं की आपण फार नशीबवान आहोत कारण आपण सुशिक्षित आहोत, त्यामुळे आपल्या बाबतीत काही वेगळं घडेल पण असं नाहीये हेच दुर्दैव. काहीही बदललं नाही शिक्षणामुळे! फक्त नोकरी मिळविण्यास लागणारे प्रमाणपत्र इतकाच उपयोग झाला अस दिसतंय. आपल्याकडे अनेक पालक मुलींना का शिकवितात तर चांगला वर मिळावा म्हणून. तिने स्वतंत्र विचार करावा हा हेतू का नाही गं त्त्यामागे.
खरंच तुला पडलेला प्रश्न मलाही पडलाय, "लग्न म्हणजे नेमकं काय? " आणि म्हणूनच तुझी पोस्ट मी एक दोन नाही तर चक्क पाचदा वाचून काढली. खूपच मोठा विषय आहे हा आणि तसंच अनेक प्रश्न निर्माण करणारा, तरीही दुर्लक्षित. खरचंच दुर्लक्षित राहिलाय की आपणच ठेवलाय?
स्त्री-भ्रूण हत्या होते म्हणुन आपण बर्‍याचदा ओरडतो कधी तर जिच्या भ्रूणाची हत्या होते त्या स्त्रीला बोलून मोकळे होतो की एक स्त्री असूनही स्त्री-भ्रूण हत्या घडू देते. स्त्रीला निसर्गाने इतकं संवेदनाशील बनवलं आहे की कुठलीही स्त्री स्वतःच्या अंशाला संपवायला इतकी सहज तयार होईल?
तिलाही वाटत असेल ना की माझ्या मुलीला जन्म द्यावा. पण ती इतकी निर्दयी का होत असेल याचा कुणी विचारच करत नाही. एकदा तिच्या मनात डोकावून बघा, काय होत असेल तिची अवस्था अशावेळी...कल्पना करणं देखील अवघड आहे मग किती बळ लागत असेल हे सगळं पचवायला.
भ्रूभ्रूणहत्येचंही कारण लग्न या प्रथेत दडलंय असं नाही का वाटत? कुठल्या आईला वाटत असेल की माझ्या मुलीने या जगात जन्म घ्यावा आणि माझ्या वाट्याला आलेले सगळे भोग थोड्या वेगळ्या पद्धतीने तिच्याही वाट्याला यावेत...
पुन्हा मुलीला वाढवणं तेही आजच्या काळात किती अवघड! किती दूषित झालंय सगळं वातावरण. प्रत्येक दिवशी स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्यांमध्ये वाढच होत आहे. मग अशा परिस्थितीत मुलीला डोळ्यात तेल घालून वाढवायचं, अनेक वाईट नजरांपासून जपायचं, ती घराबाहेर पडताच काय अतिप्रसंग ओढवला जाईल याची खात्री नाही, ती घरात येईपर्यंत जीवाला घोर!
काही अतिप्रसंग ओढवला तिच्यावर तर तिच्यासोबत संपूर्ण कुटुंब कोलमडून पडतं. अशावेळी त्या मुलीला फक्त एक जिवंत प्रेत म्हणून सांभाळत रहायचे कारण तिला कोण स्वीकारणार?
परवा India's daughter बघितल्यावर तर विचारांनी नुसतं थैमान घातलं आहे डोक्यात, रात्रभर झोप लागली नाही.
आणि लग्न या प्रकाराबद्दल न बोलणंच बरं... वैतागून गेले आहे अगदी! पद्धत फक्त बदलली, पारंपरिक कांदेपोहे जाऊन आधुनिक पद्धत आली मुलगी आणि मुलगा यांनी बाहेर भेटायला लागले. पण यामुळे काय बदललं?  काहीही नाही, बाकी सर्व गोष्टी जैसे थे!
बुध, गुरु, शुक्र, शनि या सगळ्यांनी पत्रिकेत इतकी गर्दी केली आहे काय सांगू तुला? मंडळाला तर फारच महत्त्व आहे. असं वाटतं की या सगळ्या ग्रहांनी खेळ मांडला आहे माझ्या आयुष्याचा! त्यात हे ज्योतिष लोक ज्यांना स्वतःच्या आयुष्यात कधी काय होईल याची कल्पना नाही, ते दुसर्‍यांच्या कुंडल्या मांडून त्यावर भाकीत करू लागले आहेत. काय आपण माणसं ना, किती तो अट्टाहास भविष्यात काय घडणार आहे हे जाणून घेण्याचा!  बरं मुलीची पत्रिका पाहताना नुसते गुण जुळून चालत नाही. येणाऱ्या मुलीमुळे आपल्या घराची भरभराट होईल का? तिला अपत्यप्राप्ती होईल की नाही? किती ते प्रश्न! जणू अपत्यप्राप्ती होणे फक्त तिच्याच हातात आहे. पत्रिकेत 36 गुण मिळाले असून घटस्फोट झालेली जोडपी पण आहेत आणि पत्रिका न पाहता संसारसागर यशस्वी पार केलेली सुद्धा!
खरंच किती मोठी आणि भयानक गोष्ट आहे लग्न म्हणजे! 
स्वतःचं म्हणजे फक्त म्हणण्यापुरतं असं आईबाबांच घर सोडून एका नव्या घरात जायचं अचानक एके दिवशी, तेव्हापासून त्या घराला आपलं म्हणायचं...प्रत्येकाचं मन सांभाळून वागायचं...आपलं काही चुकत नाही ना याची सतत काळजी! सर्वांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन जगा आणि कुठे कमी पडलो की बोल आईबाबांना.
आणि यात सगळ्यात जास्त वाईट वाटतं आईबाबांच. मुलीचे आईवडील होण आणि आयुष्यभर या गोष्टीची काळजी करत जगणं, हे आपण आईवडील होण्याआधीच अवघड वाटतंय. मुलीचे लग्न व्हावे यासाठी अनेक उंबरठे झिजवायचे, प्रसंगी मानहानी पत्करायची तयारी ठेवावी लागते. काय आणि किती सहन करावे लागते मुलीच्या आईवडिलांना हे स्वतःच्या आईवडीलांकडे पाहून कळतंय. मुलीचं लग्न होईपर्यंत ते कधी होणार या विचारात जगायचं आणि लग्न झाल्यावर मुलगी सासरी सुखी आहे का याची चिंता करीत बसायचं.
का नाही वाटणार गं आईवडिलांना मुलगी नको आपल्याला?
हल्ली तर प्रत्येक आठवड्याला एकच काम करतीये मुलांना भेटणं! लग्न हेच भारतीय स्त्रीच्या आयुष्याचं ध्येय बनवून ठेवले आहे.
जाऊदे मी बोलतच राहिले, लक्षातच नाही आलं कुठलं तरी नवीन स्थळ आणलंय त्याविषयी बाबांना बोलायचं आहे. कितीही राग आला,  वाईट वाटलं तरी आईबाबांच्या समाधानासाठी सगळं चालू आहे.
दर वेळी पुन्हा नव्याने सुरुवात. तेच बोलायचं, तेच ऐकायचं, तेच प्रश्न आणि तीच उत्तरं फक्त नट वेगळा आणि कधीतरी जागा वेगळी...आणि पुन्हा नकार आला की स्वतःची, आईबाबांची समजूत काढायची.
चल ठेवते मी फोन..."
मनालीने फोन ठेवला पण डोक्यात विचारांची अजून पाखरण करून गेली..

Wednesday, April 1, 2015

शब्दांची रांगोळी सुंदर
त्याला यमकाचा आधार
कुणी म्हणे काव्य मधुर
कुणा वाटे जणू शब्दखेळ...

कुठे खोलवर जखम
कुठे आनंदी आठवण
काव्याविना जणू
दोन्ही निराधार...

Friday, March 27, 2015

कथा (की व्यथा?) फेसबुक कुमाराची...

दोन आठवड्यापूर्वी दुचाकीवरून जाताना छोटासा अपघात झाला आणि गाडी दुरूस्तीसाठी द्यावी लागली. त्यामुळे जवळजवळ सहा महिन्यानंतर बसने प्रवास करण्याचा योग आला.
योग म्हणण्याचे कारण म्हणजे बस, लोकल ट्रेन किंवा इतर पर्याय (सहाआसनी वगैरे) यांनी प्रवास करणे मला प्रचंड आवडते पण दुचाकी वापरायला सुरुवात केल्यामुळे ते हल्ली दुर्मिळ झाले आहे. या प्रवासात नाना प्रकारचे लोक भेटतात, निरीक्षणं करायला मिळतात. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक माणूस बरंच काही शिकवून जातात. या सगळं पाहिल्यावर  उगाच पर्वताएवढे वाटणारे स्वतःचे  छोटे छोटे प्रश्न अचानक राईएवढे वाटू लागतात.
असो नमनाला घडाभर तेल कशाला?
तर झालं असं, मी वाट पहात होते बसची पण काही केल्या बस येईना. जवळच माझ्या घराकडेच जाणारी सहाआसनी रिक्षा निघण्याच्या तयारीत होती. मग विचार केला की इथे वाट पहात बसण्यापेक्षा अर्धे अंतर नक्कीच जाईन आणि मग बसले.
दोन दिवसांपूर्वीच पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत होता आणि मस्त वाटत होतं. हिरवीगार शेतं एका नव्या जोमाने डोलत होती.
माझ्यासह आणखी १३ माणसांना दाटीवाटीने बसवले होते नव्हे कोंबले होते. सहाआसनी मध्ये १३ प्रवासी+१ चालक हे फक्त भारतातच घडू शकते.
माझ्याच शेजारी एक मुलगा बसला होता. चेहर्‍याने साधारण १२-१३ वर्षांचा वाटत होता पण नेमका अंदाज येत नव्हता. हातात मोबाईल फोन घेऊन काहीतरी करण्यात मग्न होता. मला वाटले गेम खेळत असावा. काय करणार होता तो बिचारा एवढ्या गर्दीत? कंटाळून गेला असेल असं वाटत होतं.
हल्ली तुम्ही बस किंवा ट्रेन मध्ये बसलात की शेजारची व्यक्ती मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसलेली असते. बर्‍याच वेळाने चुकून जर त्या व्यक्तीने मान वर केली तर चेहरा दिसतो. ओळखीची व्यक्ती सुद्धा मान वर करेपर्यंत अनोळखी वाटते.आपण मोठेच असे वागतो, तिथे या चिमुरड्यांना दोष का द्यायचा? शेवटी ते आपलंच अनुकरण  करतात ना...
थोड्या वेळाने पुन्हा नजर त्या मुलाकडे वळली आणि पाहिलं तर काय फेसबुक उघडून बसला  होता. मग मात्र काय आहे याचं वय याची उत्सुकता आणखीनच वाढली. म्हणून मग  विचारलंच त्याला शेवटी, “कितवीत आहेस तू?“
जरासा गोंधळला आणि मग हळूच उत्तर दिलं, “सहावी...“
एकंदरीत त्याच्याकडे पाहून आणि गोंधळलेला त्याचा चेहरा पाहून एका छोट्याश्या गावातील असावा असं वाटलं आणि ते सुद्धा खरंच होतं. माझं लक्ष त्याच्याकडे आहे हे लक्षात आल्यावर थोडावेळ त्याने मोबाईल माझ्यासमोर काढला नाही. पण १०-१५ मिनिटांत पुन्हा मोबाईल मध्ये मग्न झालाच. आता आणखी काही प्रश्न विचारले तर तो अजुन भांबावेल या विचाराने स्वतःला आवरले आणि शांत बसून फक्त निरीक्षण करायचे असे ठरवले.
आता मला त्याच्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे शक्य झाले कारण त्याने मोबाईल मध्ये लक्ष केंद्रित केले होते.
मोबाईल फोनची भाषा मराठी होती. या मुलाला आपण काही काळ  Facebook कुमार म्हणूया (किंवा fb कुमार). या आपल्या  fb कुमाराला फेसबुक म्हणजे काय हे नुसतं माहीत नव्हतं तर तो सक्रिय वापरकर्ता (active user) असावा असे वाटत होते. त्याने त्याचे स्वतःचे खातेही (profile) तयार केले होते. स्वतःचा फोटो आवडला नव्हता कदाचित किंवा शाहरुख खानचा खूप मोठा चाहता असावा म्हणून त्याने शाहरुख खानचा फोटो profile picture ठेवला होता. मला वाटले की फक्त खाते उघडले आहे फेसबुक वर पण इतक्यातच थांबला असता तर त्याचे नामकरण फेसबुक कुमार किंवा fb कुमार ठेवले नसते... त्याच्या मित्रांच्या यादीत ६0-७0 मित्रमैत्रिणी होते तेही कदाचित त्याच्या वयाचे असावेत असा अंदाज. आमच्या समोरच एक महाविद्यालयीन युवक बसला होता. पदवी किंवा तत्सम काहीतरी करत असावा. त्याचा लक्षात आलं माझं निरीक्षण अन् मग माझ्याकडे पाहून कुत्सित हसला आणि म्हणाला, " अवघड आहे या पिढीचं ! " मलाही मग हसू आलं की केवळ ६-७ वर्षांनी मोठा आहे हा त्या फेसबुक कुमारापेक्षा पण चक्क एका पिढीचं अंतर मानत होता स्वतः आणि फेसबुक कुमारामध्ये...
अजूनही माझे प्रश्न मला स्वस्थ बसू देत नव्हते मग fb कुमाराला विचारले, "कुणाचा आहे हा मोबाईल? आईचा की बाबांचा? "
त्याने माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले मग त्याच्या शेजारी बसलेली स्त्री त्याची आई असावी असं वाटलं म्हणून मी तिला विचारले, "तुमचा मुलगा आहे ना? कशाला द्यायचा एवढ्या लहान मुलाला मोबाईल?" पण नेमका माझा अंदाज चुकला आणि कोपर्‍यात इतका वेळ शांत बसून असलेली त्याची आई म्हणाली, "माझं पोरगं आहे ताई. आमाला काय बी कळत नाही त्यातलं, याच्या बापाला अन् मलाबी. कोणचा मोबाईल घ्यायचा तेबी कळत नवतं. पर पोरगं लय हुशार. त्याला समदं कळतंय त्यातलं. त्योच वापरतो."
मग मी थोडं समजुतीच्या स्वरात म्हणाले, "अहो आहेच तो हुशार. इतक्या लहान वयात इतकं सगळं कळतंय त्याला. पण अहो अशाने तो नको त्या गोष्टी पण वापरत असेल ना , ज्या त्याने वापरायला नको आहेत. "
तरीही त्याच्या आईचं एकाच म्हणन होता, "आवो सगळ कळतंय त्याला. लई हुशार हाये तो . ' असं बोलून त्या थांबल्या.
आता डोक्यात विचारचक्र सुरु झालं. नवीन तंत्रज्ञान आलंय अगदी प्रत्येक जण ते वापरतोय नक्कीच चांगली गोष्ट आहे पण … या पण ने मात्र गोंधळ सुरु केला होता आता माझ्या डोक्यात. ज्यांचे आईवडील सुशिक्षित आहेत त्यांना हे सांगा येऊ शकतं कि आपली मुलं काय पाहतात काय नाही याकडे लक्ष ठेवा तर एकवेळ ठीक आहे पण ज्यांना स्वताला तंत्रज्ञानाबद्ददल काही माहिती नाही, जिकडे शिक्षणाचा अभाव आहे त्यांना हे सगळ कसा समजावणार? मग अशा वेळी या चिमुरड्यांना कोण योग्य मार्ग दाखवणार? मग अशावेळी मार्ग दाखवणारा एकाच वाटाड्या समोर दिसतो आणि ते म्हणजे त्यांचे शिक्षक, कारण मुलांचा सर्वात जास्त वेळ शाळेत जातो. ते नक्कीच त्यांना मदत करू शकतील. इंटरनेट वापराच असेल तर नक्की त्याचा वापर कसा व्हायला हवा हे शिक्षक मुलांना सांगू शकतील. पण त्यासाठी आपण नक्कीच काहीतरी प्रयत्न करायला हवेत. आपल्याकडे तंत्रज्ञानाचा विकास होतोय याच गोष्टीवर फक्त भुरळून न जाता त्यातून होणारे संभाव्य तोटे पण लक्षात घ्यायला हवेत.
हल्ली बर्याचवेळा उन्हाळ्याची, दिवाळीची सुट्टी सुरु झाली किंवा इतर वेळीही गेम खेळण्यासाठी म्हणून cyber cafe मध्ये जातात. बरं ताशी १५-२० रुपये इतका दर असतो त्यामुळे पालकही या गोष्टीला नाही म्हणत नाहींत कारण तेही विचार करत असतात कि घरात बसून कंटाळा आलाय हे ऐकण्यापेक्षा १५-२० रुपये देणे परवडले. पण त्यावेल्ली ते हा विचार करत नाहीत कि तिकडे जाऊन आली मुले नक्की काय करतात? हल्ली शाळांमधूनही अनेक projects करायला सांगितले जातात त्या निमित्तानेही मुले cyber cafe मध्ये जातात.
मुलांनी इंटरनेट वापरणे ही गोष्ट चुकीची नाही पण काय आणि कसा वापरावं याचं मार्गदर्शन आपण त्यांना करायला हव. जेणेकरून ते इंटरनेट चा उपयोग अनेक चांगल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी करू शकतील…

Monday, March 16, 2015

तू...

गर्द हिरवे रान तू
पावसाळी थेंब तू
तू सखा रे जिवलगा
की नवी एक आस तू...

दर्दभरी सांज तू
मदभरी एक रात तू
तू माझा रे प्रियतमा
की हवासा भास तू...

माझा हरेक श्वास तू
ध्यासही तूच तू
येणे तुझे भासे जसा
पहिला वहिला पाऊस तू...

Saturday, March 14, 2015

माझी आई

ती...माझी आई

या जगात आल्यानंतर
जिला मी पहिल्यांदा पाहिलं ती...
की जिच्यामुळे मी या जगात आले ती...
तसं पाहिलं तर जन्माच्या नऊ महिने आधीच
मी या जगात आले आणि  वाढले
पण तिचाच अंश म्हणून...
आणि ज्याला जन्मदिवस म्हणतात तो म्हणजे
तिच्यापासून वेगळं होऊन स्वतंत्र जीव म्हणून वाढण्याची सुरूवात
नऊ महिने फार सोसावं लागलं तिला
मला उदरात वाढवताना
जन्मानंतर पण असंख्य पथ्य
खाण्याची, पिण्याची अन् बाहेर फिरण्याची
कारण या सगळ्याचा
मला त्रास होतो म्हणून
सगळं सोसते माझ्यासाठी ती...

जन्मानंतर अनेक दिवस
माझी आई म्हणजे
संपूर्ण जग होतं माझ्यासाठी
अन् तिच्याहीसाठी फक्त मी
पण फरक हा की
इतर असंख्य जबाबदाऱ्याही पेलत असे ती
एकाच वेळी
कसं जमवलं सगळं तिने
फक्त तिलाच ठाऊक...

मी काही वावगं वागले
तर बोल लावले जातात तिला
"आईने हेच शिकवले का?"
पण चांगलं वागल्यास
त्या कौतुकात बाबांना पण वाटा
असं का हे आजवर उमगले नाही
तरी याबाबत कधीच तक्रार नाही करत ती...

हळूहळू माझं एक स्वतःच
जग तयार झालं
पण आजही मी जेवल्याशिवाय
घशाखाली घास उतरत नाही तिच्या
अन् मी घरी आल्याशिवाय
डोळ्याला डोळा लागत नाही तिच्या
कायम माझ्या जगात
गुरफटलेली असते ती...
आजही आणि कदाचित यापुढेही
आम्ही मुले आणि घर
या तिच्या "high priorities" आहेत
पण अजून एक प्रश्न
अनुत्तरीतच आहे
कसं जमतं तुला हे सगळं?
काहीही झालं तरी
शेवटी फक्त असते ती...

 ती...माझी आई

 

Friday, March 13, 2015

लग्न म्हणजे नेमकं काय?...भाग -1

लहानपणी अनेकदा लग्न हा शब्द ऐकून नेहमी मला प्रश्न पडायचा, "लग्न म्हणजे नेमकं काय? " मग घरातल्या मोठ्या माणसांना विचारल्यास एकच उत्तर मिळायचे, "अजून लहान आहेस. योग्य वेळी कळेल."
हळूहळू मग यावर विश्वास बसला की लग्न या प्रकरणासाठी योग्य वेळेची वाट पहावी लागेल.  मग पुन्हा मधेच  वाटायचे कधी येणार ही योग्य वेळ?  जसं मोठं होण्याची घाई वाटू लागली.
 यानंतर मधे बराच काळ लोटला अन् अचानक एक दिवस घरात लग्न या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. आईची बाबांच्या  कानी कुजबुज सुरू झाली, "अहो लग्नाचं वय झालं आता, काहीतरी हालचाल  सुरू करावी लागेल."स्वारी खुश झाली कारण आता योग्य वेळ आली होती.
आतापर्यंत अनेक कथा कादंबर्‍यांमध्ये वाचलं होतं, लग्न म्हणजे दोन अनोळखी माणसांबरोबरच दोन परिवारात तयार होणारं एक सुंदर नातं...
आणि मग वर वरसंशोधनाची प्रकिया सुरू झाली. जे काही समज होते लग्नाबद्दल त्याचं गैरसमज आणि प्रश्नांत कधी रूपांतर झालं ते कळलं नाही.
तुकाराम सांगून ठेवले आहे,
"ऊस गोंडा परि रस नोहे गोंडा
काय भुललासी वरलिया रंगा"
(मतितार्थ-: ऊस वाकडातिकडा दिसत असला तरी त्याचा रस फार गोड असतो.)
इथे या ऊक्तीची आठवण झाली हे सांगण्याकरिता की बाह्यरूपावर भुलून जाऊ नये. माझंही तेच झालं लग्नाच्याबाबतीत. वरवर पाहता छान, सुंदर आणि सहज वाटणारी ही गोष्ट फारच गुंतागुंतीची आहे हे कळायला वेळ नाही लागला.
पण आज खरंच पुन्हा एकदा हा प्रश्न पडलाय, "लग्न म्हणजे नेमकं काय?" तोही अगदी लग्नाचं वय झाल्यावर...
अनेकांच्या मते माझं लग्नाचं वय उलटून चाललंय कारण माझ्या वयाच्या जवळजवळ सगळ्याच मुलींची लग्ने झाली आहेत.काहींना तर अपत्य प्राप्तीही झालीये.
पण मला कळत नाहीये अजूनही की फक्त मलाच हा प्रश्न सतावतोय की माझ्याबरोबरच माझ्यासारख्या अनेकांना... 
पण ज्यांची लग्न झाली आहेत त्यांना तरी गवसलंय का या प्रश्नाचं उत्तर?
वर्तमानपत्रातील एखादी जाहिरात वाचा किंवा  matrimonial site वरील एखादं प्रोफाईल पहा, खालील वर्णन वाचायला मिळेल:
" उंची : ---, गोरी, सुंदर, सुशिक्षित, सुसंस्कारी, सडपातळ,  गृहकृत्यदक्ष, ..."
या तर झाल्या सर्वसाधारण अपेक्षा पण " व्यक्ती तितक्या प्रकृती" या ऊक्ती प्रमाणे त्यात बदल अपेक्षित आहेत. बर्‍याचदा मुलगा अभियंता असेल तर मुलगी अभियंताच हवी किंवा   मुलगा डाॅक्टर असेल तर मुलगी
डाॅक्टरच हवी, हे असतंच.
गव्हाळ, सावळा किंवा अगदी काळा मुलाचा पण हट्ट असतो की गोरी मुलगी तेव्हा आपण स्वतःच आपल्या रंगाचा अपमान करतो हे कळत नाही का त्याला?
बरं अनेकांना तर उंचीतही अजिबात तडजोड चालत नाही. आयुष्याचा जोडीदार निवडणं म्हणजे स्वतःच्या उंचीचा कपडा निवडण्यासारखं आहे का अगदी तंतोतंत जुळायला? आणि तसंही उंची जरा कमीजास्त होती म्हणून एकमेकांशी पटलं नाही असं उदाहरण अजून तरी ऐकलेलं नाही.
पुढची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं family status आणि it matters lot.
मुलाच्या घरातल्या मंडळींना आणि बर्‍याचदा मुलांनाही सधन कुटुंबातील मुलगी हवी असते
अगदीच सधन कुटूंब नसले तरीही तुमचं योग्य आदरातिथ्य, मानपान करण्याइतपत तर नक्कीच हवी, असं वाटतं. लग्नसमारंभात सगळं जिथल्या तिथे करणारं, कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू न देणारं प्रसंगी कर्ज काढून हौस पुरवणारं , मुख्य म्हणजे न मागता बरंच काही देणारं (उदा.सोनं, फर्निचर, चांदीची भांडी जमलं तर एखादी चारचाकी,...इत्यादी) कुटुंब हवं असतं. अगदी तोलामोलाचं म्हणजे जगासमोर कौतुकाने सांगता येतं हो, " आम्ही काही मागितले नाही म्हणजे अपेक्षाच नव्हती आमची काही. पण व्याह्यांनी नको म्हणत असतानाही अगदी भरभरुन दिलं".

वरवर आधुनिकतेचा बुरखा पांघरून " आमची काही अपेक्षाच नव्हती" असं म्हणणार्या महाभागांची समाजात कमतरता नाही आणि यात उच्चशिक्षित कुटुंबांचा समावेश आहे हीच समाजाची व्यथा आहे.
याचा अर्थ हाच की शिक्षणाने तुमच्या विचारांची पातळी सुधारते का? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.
मुलगी उच्चशिक्षित, चांगल्या पगाराची नोकरी करणारी असावी त्या वेळी ती गृहकृत्यदक्ष पण असायलाच हवी अशी अपेक्षा असते पण त्याच वेळी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बर्‍याचदा शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने मुलीला घरापासून दूर राहावे लागते आणि मग त्यामुळे आपोआपच घरकामात मुलींचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे पण पाण्यात पडल्यानंतर चुका करत का होईना पोहायला शिकतोच की प्रत्येक जण. खरचंच या टप्प्यावर प्रत्येक विवाहेच्छुक मुलगा आणि मुलगी यांनी विचार करण्याची गरज आहे " लग्न म्हणजे नेमकं काय? " दोन मने जुळणं, दोन भिन्न परिवार एकत्र येणं,  दोन भिन्न परिस्थितीत वाढलेली माणसं एकत्र नांदणं, दोन परिवारांनी सुखदुःखात एकमेकांना मदत करणं, नव्याने संसार सुरू केलेल्या दोघांना गरज पडल्यास मार्गदर्शन करणं की आपल्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादण्याऐवजी त्यांना एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी मदत करणं ह्या सगळ्या गोष्टी फक्त काल्पनिक आहेत का?

आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न हा एक महत्वाचा संस्कार मानला जातो. आमच्याकडे लग्न टिकतात (की टिकवतात?) आणि घटस्फोटांचं प्रमाण अगदी नगण्य आहे, असं आम्ही अभिमानाने सांगतो पण आज खरंच ही परिस्थिती आहे का?
लग्न ठरवताना माणसांपेक्षा उगीचच अवास्तव गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे.  अवास्तव गोष्टींवर अमाप पैसा खर्च केला जात आहे. आधीच आपल्या समाजात मोठी आर्थिक दरी आहे. मूठभर श्रीमंत माणसे लग्नात भरपूर पैशांची उधळपट्टी करण्यात आणि बाकीचे लोक त्याचे अनुकरण आंधळेपणाने करतात प्रसंगी कर्ज काढून म्हणजे " ऋण काढून सण साजरा करतात".
पण खरंतर या साऱ्या गोष्टींची गरज आहे का? इतके मोठे सोहळे, समारंभ करण्याची गरज आहे का? हेच पैसे एखाद्या सामाजिक कार्यासाठी एखाद्या संस्थेला मदत केली जाऊ शकते.
काही महाभाग यावर असंही म्हणतील की, 'आमचे पैसे आहेत ते आम्ही हवे तसे खर्च करू, तुमचा यावर आक्षेप का?' आता ह्याला काय म्हणावे?
लग्नामध्ये आजकल एका पद्धतीचे जेवण नसते तर निरनिराळ्या पद्धतींचे, सोबतीला आइस्क्रीम, पाणीपुरी नाना प्रकार. किती जेवण वाया जात असेल श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याच्या नादात?
सारासार सोडाच पण थोडाही विचार केला जात नाही या सगळ्यात. आजही आपल्या देशात एक वेळ जगणारे लोक आहेत तसंच उपासमारीने मरणारे पण आहेत. अशावेळी एवढं सगळं अन्न असं एकाच दिवशी  वाया घालवणं किती चुकीचे आहे, याचा विचार केला पाहिजे. किंबहुना आजच्या तरुण पिढीने तो करणं नक्कीच अपेक्षित आहे.
लग्न ठरवताना विशेषतः arrange marriage मध्ये पाहिली जाणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जात.
कामांची योग्य प्रकारे विभागणी व्हावी, एकाच  प्रकारचे काम अनेकांनी करु नये यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्ण किंवा जाती तयार केल्या पण आजही आम्ही माणूस ही जात विसरून त्यांनाच गोंजारत बसलो आहोत. जन्मलेल्या बाळाला जन्मापासून मरेपर्यंत ही जात नावाची गोष्ट साथ करते, जणूकाही माणसाच्या शरीराचं एक अविभाज्य अंग. म्हणजे भारतात एखादा अवयव नसताना माणूस जगू शकतो पण जातिशिवाय नाही.
मग लग्न ठरवताना तर या गोष्ष्टीला विशेष महत्व आहे. मुलगा किंवा मुलगी ही स्वजातीय असायलाच हवी.
तरीही आजकाल अनेक समंजस माणसांनी यात थोडी तडजोड करायला सुरुवात केली आहे ती म्हणजे "उच्चजातीय" किंवा  "उच्चआंतरजातीय" वधू/वर चालेल. प्रत्येकालाच आपली जात उच्च आहे असंच वाटणार ना? मग उच्चजात कशी आणि कोण ठरवणार? काय निकष लावणार त्यासाठी?  कोण उच्चजातीय किंवा कोण नीचजातीय हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
कुठे जन्म घ्यावा, सधन कुटुंबात की निर्धन, उच्चजातीत की  नीचजातीत, हे कुणाच्या हातात नसतं मग ह्या बाबतीत भेदभाव करण्याचा अधिकारही आपल्याला नाही.
खरचंच विचार करायला हवा, तोही गांभीर्याने. लग्न म्हणजे काय हा प्रश्न पुन्हा पुन्हा सतावतोय मला. दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाहीये उलट या प्रश्नाने अनेक नव्या प्रश्नांना जन्म दिलाय.
लग्न म्हणजे काय?
मनं जुळणं की family status?
भावी आयुष्याचा जोडीदार शोधणं की भविष्याची तरतूद करणारं घराणं?
मनाचं सौंदर्य शोधणं की शरीराचं?
एखाद्याचा रंग पाहून त्याला नाकारणं की एकमेकांच्या रंगात एकरूप होऊन जाणं?
निरपेक्ष प्रेम आणि नातं की अपेक्षांचं अवास्तव ओझं??? 

Friday, March 6, 2015

Untitled

हात तुझा हाती घेऊन
मला चांदण्यात फिरायचय
नसेल चांदणं नभात तर
तुझ्या डोळ्यांत अनुभवायचंय

हात तुझा हाती घेऊन
मला पावसात भिजायचंय
सरी नसल्या गगनात तर
तुझ्या शब्दसरींनी चिंब व्हायचंच

हात तुझा हाती घेऊन
खूप काही सांगायचंय
नसता शब्द ओठी
नजरेतून गूज ऊलगडायचंय