Friday, January 8, 2016

गोष्ट

गोष्ट - प्रत्येकाने केव्हातरी कुठेतरी ऐकलेली असतेच. आजी-आजोबा , आई बाबा, शाळेचे शिक्षक, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक किंवा इतर कुणी अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीने केव्हातरी गोष्ट ही ऐकलेली असतेच. मला नाही आठवत आत्ता कि मी पहिली गोष्ट कधी, केव्हा, कशी आणि कुणाकडून ऐकली हो पण इतकं मात्र नक्की कि जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून हा गोष्ट नावाचा प्रकार मला भयानक आवडतो आणि विशेष म्हणजे जिव्हाळ्याचाही वाटतो. 

मला वाटत प्रत्येकाने आपल्या लहानपणी पहिली गोष्ट नक्की ऐकलेली असेल आणि ती म्हणजे चिऊ-काऊची, आजही त्याची सुरुवात आठवते, "एक होता काऊ आणि एक होती चिउ… काउच घर होतं शेणाचं नि चिउच घर होतं मेणाचं...एकदा काय झालं मोठ्ठा पाऊस आला..." अशी ती गोष्ट, एका पिढीकडून दुसरीकडे चालत आलेली. यावर माझं असं मत आहे कि लहानपणी आपली प्राणी, पशुपक्षी यांच्याशी जर जास्त जवळीक असते ते म्हणजे चिऊ, काऊ, माऊ, भूभू …इत्यादि आणि हे लक्षात घेऊनच कुणीतरी ही गोष्ट तयार केली असावी. 

उन्हाळ्याची  सुट्टी संपून जेव्हा शाळा सुरु होण्याचे वेध लागायचे तेव्हा नव्या इयत्तेची पुस्तके घरी यायची आणि मग बालभारती, इतिहास, छान छान गोष्टी ही पुस्तक प्रथम उघडून पाहणं आणि त्यातल्या गोष्टी वाचून काढणं हे महत्वाचं काम असायचं त्यावेळी. कारण हे गोष्टींचं वेडं काही स्वस्थ बसू दयायचं नाही. माझी घरी वाचनाची तशी फार कुणाला आवड नव्हती पण शाळेतील शिक्षकांना माझं हे वेड लक्षात यायला वेळ नाही लागला आणि मग मला वेळोवेळी नवनवीन पुस्तक पुरवून याला खतपाणी घातलं.    
पण पुढे जाऊन यात मात्र बदल होऊ लागला तो असा कि आपण वाचलेली गोष्ट कधी एकदा दुसर्या कुणाला तरी सांगतोय असा वाटायला लागलं. हि माझी हौस बऱ्याचदा शाळेत मोकळा तास असेल किंवा शिक्षकांना काही महत्वाच काम असतानाही वर्गावर यावच लागलं असेल किंवा शिकविण्याचा मूड नसेल त्यांचा. तसंच सुट्टीत आजोळी किंवा एखाद्या नातलगाकडे गेलं कि मी आपली गोष्ट सांगायला कायम तत्पर. मग मात्र  कायम नव्या गोष्टी हव्या होत्या सांगण्यासाठी कारण त्याच त्या गोष्टी किती दिवस सांगणार ना!  

कित्तीतरी गोष्टी ऐकल्या मी लहानपणी जसे कि - राजा राणीच्या, अलिबाबा आणि चाळीस चोर, विक्रम वेताळ, पंचतंत्रातल्या गोष्टी, राक्षस आणि राजकुमारीच्या गोष्टी, परीकथा, जादूच्या गोष्टी, रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी,शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा, अकबर-बिरबलाच्या गोष्टी, कृष्णाच्या गोष्टी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या गोष्टी,तुकाराम, एकनाथ ज्ञानेश्वर अशा संतांच्या गोष्टी… असा कितीतरी गोष्टी मी माझ्या लहानपणी ऐकल्या. म्हणजे खूप मोठा खजिना होता तो एक ज्याचा मनमुराद आनंद उपभोगत होतो आपण. आता खरंच  असा वाटतंय कि ऐकलेली प्रत्येक गोष्ट लिहून ठेवायला हवी होती पण जेव्हा एखादी गोष्ट सहज मिळत असते तेव्हा तिचं महत्व कळत नाही म्हणतात तेच खरं.  

काय नाही दिलं या गोष्टींनी? खूप काही तेही आपल्या नकळत. लहान मुलांनाच काय मोठ्यानाही  काही उपदेश करायचा असेल किंवा काही पटवून द्यायचं असेल तर गोष्टी सारखं चांगलं  माध्यम नाही. थोरामोठ्यांच्या गोष्टी ऐकून तर अरे आपणही असंच काहीतरी केलं पाहिजे मोठं होऊन असं वाटल नसेल तर नवल, इतकं सामर्थ्य होतं म्हणजे अजूनही आहे या गोष्टींमध्ये.

खरं म्हणजे गोष्टी सांगणं हि सुद्धा एक कला आहे जी प्रत्येकाला जमतेच असं नाही. पण गोष्टी सांगण्यामुळे अंगी सभाधीटपणा आला आणि इथूनच मग वक्तृत्वाची गोडी लागली. आवाजात कुठे चढ-उतार असावा, कुठे थोड थांबावं हे हळूहळू शिकवलं या गोष्टींनी. ऐकणाऱ्याला जागीच खिळवून कसं ठेवावं आणि जे काही सांगतोय तो प्रसंग नेमका कसा उभा करायचा ऐकणाऱ्याच्या डोळ्यांसमोर कसा उभा करावा हे पण कसब शिकवलं याच गोष्टींनी. 

अशा गोष्टी सांगणाऱ्या लोकांना मग शाळेतील मोकळ्या तासाला, पावसाळ्यात पीटीच्या तासाला बाहेर जाण शक्य नसेल तेव्हा फार महत्व असायचं. आमच्या शाळेत सगळे सण-समारंभ, थोर नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथी हे सारं अगदी साग्रसंगीत व्हायचं आणि मग प्रत्येक वेळी त्या दिवसाचं/व्यक्तीचं महत्वही अथवा गोष्ट सांगितली जायची. त्यासाठी प्रत्येक वर्गातून एका विद्यार्थ्याची निवड व्हायची.तसे सण तर सगळ्यांच्याच घरी साजरे व्हायचे पण तरीही दरवर्षी त्याचं महत्व ऐकण्यातही नाविन्य जाणवायचं, अर्थात हे श्रेय असायचं सांगणार्यालाच. 

आमचे मुख्याध्यापक होते पटवर्धन सर त्याच नाव. सगळ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचं बोलून झालं कि शेवटी सर बोलायचे आणि खरं सांगायचं तर मी तर याची चातकासारखी वाट पाहत असायचे. पण आजवर इतकं अप्रतिम कथाकथन मी कधी ऐकलंच नाही , एक वेगळीच शैली ज्यामुळे सगळी गोष्ट जणू नजरेसमोर घडतीये असा वाटायचं. कधी आषाढी एकादशी ची गोष्ट तर कधी अफजलखानाच्या वधाची गोष्ट. कितीदातरी ऐकली अफजलखानाच्या वधाची गोष्ट पण तरीही सरांच्या तोंडून ती ऐकताना असा वाटायचं नाही कि याआधी कधी हि गोष्ट ऐकलीये असं "Content same still different style of presentation" असंच काही म्हणता येईल. 
अशा या गोष्टींमुळेच पुढे वाचनाची गोडी लागली आणि साहित्याचे बाकीचे प्रकार कधी आपलेसे वाटू लागले ते कळलंच नाही. 
खरंच माझं बालपण अक्षरशः समृद्ध केल या गोष्टींनी!!!

No comments:

Post a Comment