Saturday, March 14, 2015

माझी आई

ती...माझी आई

या जगात आल्यानंतर
जिला मी पहिल्यांदा पाहिलं ती...
की जिच्यामुळे मी या जगात आले ती...
तसं पाहिलं तर जन्माच्या नऊ महिने आधीच
मी या जगात आले आणि  वाढले
पण तिचाच अंश म्हणून...
आणि ज्याला जन्मदिवस म्हणतात तो म्हणजे
तिच्यापासून वेगळं होऊन स्वतंत्र जीव म्हणून वाढण्याची सुरूवात
नऊ महिने फार सोसावं लागलं तिला
मला उदरात वाढवताना
जन्मानंतर पण असंख्य पथ्य
खाण्याची, पिण्याची अन् बाहेर फिरण्याची
कारण या सगळ्याचा
मला त्रास होतो म्हणून
सगळं सोसते माझ्यासाठी ती...

जन्मानंतर अनेक दिवस
माझी आई म्हणजे
संपूर्ण जग होतं माझ्यासाठी
अन् तिच्याहीसाठी फक्त मी
पण फरक हा की
इतर असंख्य जबाबदाऱ्याही पेलत असे ती
एकाच वेळी
कसं जमवलं सगळं तिने
फक्त तिलाच ठाऊक...

मी काही वावगं वागले
तर बोल लावले जातात तिला
"आईने हेच शिकवले का?"
पण चांगलं वागल्यास
त्या कौतुकात बाबांना पण वाटा
असं का हे आजवर उमगले नाही
तरी याबाबत कधीच तक्रार नाही करत ती...

हळूहळू माझं एक स्वतःच
जग तयार झालं
पण आजही मी जेवल्याशिवाय
घशाखाली घास उतरत नाही तिच्या
अन् मी घरी आल्याशिवाय
डोळ्याला डोळा लागत नाही तिच्या
कायम माझ्या जगात
गुरफटलेली असते ती...
आजही आणि कदाचित यापुढेही
आम्ही मुले आणि घर
या तिच्या "high priorities" आहेत
पण अजून एक प्रश्न
अनुत्तरीतच आहे
कसं जमतं तुला हे सगळं?
काहीही झालं तरी
शेवटी फक्त असते ती...

 ती...माझी आई

 

Friday, March 13, 2015

लग्न म्हणजे नेमकं काय?...भाग -1

लहानपणी अनेकदा लग्न हा शब्द ऐकून नेहमी मला प्रश्न पडायचा, "लग्न म्हणजे नेमकं काय? " मग घरातल्या मोठ्या माणसांना विचारल्यास एकच उत्तर मिळायचे, "अजून लहान आहेस. योग्य वेळी कळेल."
हळूहळू मग यावर विश्वास बसला की लग्न या प्रकरणासाठी योग्य वेळेची वाट पहावी लागेल.  मग पुन्हा मधेच  वाटायचे कधी येणार ही योग्य वेळ?  जसं मोठं होण्याची घाई वाटू लागली.
 यानंतर मधे बराच काळ लोटला अन् अचानक एक दिवस घरात लग्न या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. आईची बाबांच्या  कानी कुजबुज सुरू झाली, "अहो लग्नाचं वय झालं आता, काहीतरी हालचाल  सुरू करावी लागेल."स्वारी खुश झाली कारण आता योग्य वेळ आली होती.
आतापर्यंत अनेक कथा कादंबर्‍यांमध्ये वाचलं होतं, लग्न म्हणजे दोन अनोळखी माणसांबरोबरच दोन परिवारात तयार होणारं एक सुंदर नातं...
आणि मग वर वरसंशोधनाची प्रकिया सुरू झाली. जे काही समज होते लग्नाबद्दल त्याचं गैरसमज आणि प्रश्नांत कधी रूपांतर झालं ते कळलं नाही.
तुकाराम सांगून ठेवले आहे,
"ऊस गोंडा परि रस नोहे गोंडा
काय भुललासी वरलिया रंगा"
(मतितार्थ-: ऊस वाकडातिकडा दिसत असला तरी त्याचा रस फार गोड असतो.)
इथे या ऊक्तीची आठवण झाली हे सांगण्याकरिता की बाह्यरूपावर भुलून जाऊ नये. माझंही तेच झालं लग्नाच्याबाबतीत. वरवर पाहता छान, सुंदर आणि सहज वाटणारी ही गोष्ट फारच गुंतागुंतीची आहे हे कळायला वेळ नाही लागला.
पण आज खरंच पुन्हा एकदा हा प्रश्न पडलाय, "लग्न म्हणजे नेमकं काय?" तोही अगदी लग्नाचं वय झाल्यावर...
अनेकांच्या मते माझं लग्नाचं वय उलटून चाललंय कारण माझ्या वयाच्या जवळजवळ सगळ्याच मुलींची लग्ने झाली आहेत.काहींना तर अपत्य प्राप्तीही झालीये.
पण मला कळत नाहीये अजूनही की फक्त मलाच हा प्रश्न सतावतोय की माझ्याबरोबरच माझ्यासारख्या अनेकांना... 
पण ज्यांची लग्न झाली आहेत त्यांना तरी गवसलंय का या प्रश्नाचं उत्तर?
वर्तमानपत्रातील एखादी जाहिरात वाचा किंवा  matrimonial site वरील एखादं प्रोफाईल पहा, खालील वर्णन वाचायला मिळेल:
" उंची : ---, गोरी, सुंदर, सुशिक्षित, सुसंस्कारी, सडपातळ,  गृहकृत्यदक्ष, ..."
या तर झाल्या सर्वसाधारण अपेक्षा पण " व्यक्ती तितक्या प्रकृती" या ऊक्ती प्रमाणे त्यात बदल अपेक्षित आहेत. बर्‍याचदा मुलगा अभियंता असेल तर मुलगी अभियंताच हवी किंवा   मुलगा डाॅक्टर असेल तर मुलगी
डाॅक्टरच हवी, हे असतंच.
गव्हाळ, सावळा किंवा अगदी काळा मुलाचा पण हट्ट असतो की गोरी मुलगी तेव्हा आपण स्वतःच आपल्या रंगाचा अपमान करतो हे कळत नाही का त्याला?
बरं अनेकांना तर उंचीतही अजिबात तडजोड चालत नाही. आयुष्याचा जोडीदार निवडणं म्हणजे स्वतःच्या उंचीचा कपडा निवडण्यासारखं आहे का अगदी तंतोतंत जुळायला? आणि तसंही उंची जरा कमीजास्त होती म्हणून एकमेकांशी पटलं नाही असं उदाहरण अजून तरी ऐकलेलं नाही.
पुढची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं family status आणि it matters lot.
मुलाच्या घरातल्या मंडळींना आणि बर्‍याचदा मुलांनाही सधन कुटुंबातील मुलगी हवी असते
अगदीच सधन कुटूंब नसले तरीही तुमचं योग्य आदरातिथ्य, मानपान करण्याइतपत तर नक्कीच हवी, असं वाटतं. लग्नसमारंभात सगळं जिथल्या तिथे करणारं, कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू न देणारं प्रसंगी कर्ज काढून हौस पुरवणारं , मुख्य म्हणजे न मागता बरंच काही देणारं (उदा.सोनं, फर्निचर, चांदीची भांडी जमलं तर एखादी चारचाकी,...इत्यादी) कुटुंब हवं असतं. अगदी तोलामोलाचं म्हणजे जगासमोर कौतुकाने सांगता येतं हो, " आम्ही काही मागितले नाही म्हणजे अपेक्षाच नव्हती आमची काही. पण व्याह्यांनी नको म्हणत असतानाही अगदी भरभरुन दिलं".

वरवर आधुनिकतेचा बुरखा पांघरून " आमची काही अपेक्षाच नव्हती" असं म्हणणार्या महाभागांची समाजात कमतरता नाही आणि यात उच्चशिक्षित कुटुंबांचा समावेश आहे हीच समाजाची व्यथा आहे.
याचा अर्थ हाच की शिक्षणाने तुमच्या विचारांची पातळी सुधारते का? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.
मुलगी उच्चशिक्षित, चांगल्या पगाराची नोकरी करणारी असावी त्या वेळी ती गृहकृत्यदक्ष पण असायलाच हवी अशी अपेक्षा असते पण त्याच वेळी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बर्‍याचदा शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने मुलीला घरापासून दूर राहावे लागते आणि मग त्यामुळे आपोआपच घरकामात मुलींचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे पण पाण्यात पडल्यानंतर चुका करत का होईना पोहायला शिकतोच की प्रत्येक जण. खरचंच या टप्प्यावर प्रत्येक विवाहेच्छुक मुलगा आणि मुलगी यांनी विचार करण्याची गरज आहे " लग्न म्हणजे नेमकं काय? " दोन मने जुळणं, दोन भिन्न परिवार एकत्र येणं,  दोन भिन्न परिस्थितीत वाढलेली माणसं एकत्र नांदणं, दोन परिवारांनी सुखदुःखात एकमेकांना मदत करणं, नव्याने संसार सुरू केलेल्या दोघांना गरज पडल्यास मार्गदर्शन करणं की आपल्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादण्याऐवजी त्यांना एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी मदत करणं ह्या सगळ्या गोष्टी फक्त काल्पनिक आहेत का?

आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न हा एक महत्वाचा संस्कार मानला जातो. आमच्याकडे लग्न टिकतात (की टिकवतात?) आणि घटस्फोटांचं प्रमाण अगदी नगण्य आहे, असं आम्ही अभिमानाने सांगतो पण आज खरंच ही परिस्थिती आहे का?
लग्न ठरवताना माणसांपेक्षा उगीचच अवास्तव गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे.  अवास्तव गोष्टींवर अमाप पैसा खर्च केला जात आहे. आधीच आपल्या समाजात मोठी आर्थिक दरी आहे. मूठभर श्रीमंत माणसे लग्नात भरपूर पैशांची उधळपट्टी करण्यात आणि बाकीचे लोक त्याचे अनुकरण आंधळेपणाने करतात प्रसंगी कर्ज काढून म्हणजे " ऋण काढून सण साजरा करतात".
पण खरंतर या साऱ्या गोष्टींची गरज आहे का? इतके मोठे सोहळे, समारंभ करण्याची गरज आहे का? हेच पैसे एखाद्या सामाजिक कार्यासाठी एखाद्या संस्थेला मदत केली जाऊ शकते.
काही महाभाग यावर असंही म्हणतील की, 'आमचे पैसे आहेत ते आम्ही हवे तसे खर्च करू, तुमचा यावर आक्षेप का?' आता ह्याला काय म्हणावे?
लग्नामध्ये आजकल एका पद्धतीचे जेवण नसते तर निरनिराळ्या पद्धतींचे, सोबतीला आइस्क्रीम, पाणीपुरी नाना प्रकार. किती जेवण वाया जात असेल श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याच्या नादात?
सारासार सोडाच पण थोडाही विचार केला जात नाही या सगळ्यात. आजही आपल्या देशात एक वेळ जगणारे लोक आहेत तसंच उपासमारीने मरणारे पण आहेत. अशावेळी एवढं सगळं अन्न असं एकाच दिवशी  वाया घालवणं किती चुकीचे आहे, याचा विचार केला पाहिजे. किंबहुना आजच्या तरुण पिढीने तो करणं नक्कीच अपेक्षित आहे.
लग्न ठरवताना विशेषतः arrange marriage मध्ये पाहिली जाणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जात.
कामांची योग्य प्रकारे विभागणी व्हावी, एकाच  प्रकारचे काम अनेकांनी करु नये यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्ण किंवा जाती तयार केल्या पण आजही आम्ही माणूस ही जात विसरून त्यांनाच गोंजारत बसलो आहोत. जन्मलेल्या बाळाला जन्मापासून मरेपर्यंत ही जात नावाची गोष्ट साथ करते, जणूकाही माणसाच्या शरीराचं एक अविभाज्य अंग. म्हणजे भारतात एखादा अवयव नसताना माणूस जगू शकतो पण जातिशिवाय नाही.
मग लग्न ठरवताना तर या गोष्ष्टीला विशेष महत्व आहे. मुलगा किंवा मुलगी ही स्वजातीय असायलाच हवी.
तरीही आजकाल अनेक समंजस माणसांनी यात थोडी तडजोड करायला सुरुवात केली आहे ती म्हणजे "उच्चजातीय" किंवा  "उच्चआंतरजातीय" वधू/वर चालेल. प्रत्येकालाच आपली जात उच्च आहे असंच वाटणार ना? मग उच्चजात कशी आणि कोण ठरवणार? काय निकष लावणार त्यासाठी?  कोण उच्चजातीय किंवा कोण नीचजातीय हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
कुठे जन्म घ्यावा, सधन कुटुंबात की निर्धन, उच्चजातीत की  नीचजातीत, हे कुणाच्या हातात नसतं मग ह्या बाबतीत भेदभाव करण्याचा अधिकारही आपल्याला नाही.
खरचंच विचार करायला हवा, तोही गांभीर्याने. लग्न म्हणजे काय हा प्रश्न पुन्हा पुन्हा सतावतोय मला. दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाहीये उलट या प्रश्नाने अनेक नव्या प्रश्नांना जन्म दिलाय.
लग्न म्हणजे काय?
मनं जुळणं की family status?
भावी आयुष्याचा जोडीदार शोधणं की भविष्याची तरतूद करणारं घराणं?
मनाचं सौंदर्य शोधणं की शरीराचं?
एखाद्याचा रंग पाहून त्याला नाकारणं की एकमेकांच्या रंगात एकरूप होऊन जाणं?
निरपेक्ष प्रेम आणि नातं की अपेक्षांचं अवास्तव ओझं??? 

Friday, March 6, 2015

Untitled

हात तुझा हाती घेऊन
मला चांदण्यात फिरायचय
नसेल चांदणं नभात तर
तुझ्या डोळ्यांत अनुभवायचंय

हात तुझा हाती घेऊन
मला पावसात भिजायचंय
सरी नसल्या गगनात तर
तुझ्या शब्दसरींनी चिंब व्हायचंच

हात तुझा हाती घेऊन
खूप काही सांगायचंय
नसता शब्द ओठी
नजरेतून गूज ऊलगडायचंय


Friday, January 3, 2014

       
                                         माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी.....

                            होते माय थोर
                            कधी जराशी कठोर
                            कधी खट्याळ प्रेयसी
                            वाटे साऱ्यांना हवीशी
                            कधी लाडाची बहिण
                            जाई दुसर्याच्या घरी
                            कधी आजी ती होऊन
                            दावी  गोष्टीतून परी
                           भार्या होऊन  कुणाची
                           त्याच्या जीवा जीव देई
                           होऊनिया कधी सखी
                           मैत्रीचेही भान राखी
                           कधी डोळा तिच्या आसू
                           कधी खळाळत हासू
                           हसू साऱ्यांनाच दिसे
                           आसू पहाया कुणी नसे



Thursday, July 12, 2012

                                              
बंध....


आयुष्याच्या एखाद्या क्षणी
 आपण इतके का अगतिक होतो,
विसरून सगळे बंध जुने ,
नव्या बांधत गुंतून जातो.
बंध प्रेमाचे, बंध रक्ताचे ,
बंध रेशमी नात्याचे,
हवे नकोसे वाटले तरी
बंध असतात आयुष्याचे.
कधी कधी तर ते असतात
फक्त तुमच्या मनीचे,
नको नको म्हटले तरी,
का वाटतात हवेहवेसे?
जुळले असी बंध जरी,
हवासा त्रास वाट्याला येतो,
न जुळता करता काय?
वर्तमानाबरोबर बविश्याही उदास होतो.

Monday, July 9, 2012

चला परत शाळेत जाऊ....

त्या दिवशी खरंचच ऑफिसला जायची अजिबात इच्छा नव्हती आणि तशी ती नसल्याने काम करण्याची तर अजिबातच नाही. असो, तरी असलेलं काम करावाच लागणार इच्छा असो नसो, हा विचार करून कामाला सुरुवात केली.
तरी इच्छा नसली कि मार्ग सापडत नाही हेच खरं. काम कराची इच्छा नव्हती आणि  काहीतरी छान वाचावे असा वाटत होतं म्हणून नेहमी जे जे ब्लॉग्स वाचते त्यावर काही नवी पोस्ट आहे का तेही पाहून झाले. आता मात्र खरच कंटाळा यायला लागला म्हणून नाईलाजाने स्वताला कामात गुंतवून घ्यायचे  ठरवले(जे नेहमीच नाईलाजाने केले जाते.)
काम करत असताना अचानक एका मित्राचा मेल आला. बघण्यात 5 मिनिटे कशाला वाया घालवायची असा विचारही आला मनात एक क्षण, पण मग non-production असं शीर्षक वाचताच तो बघण्याची उत्सूकता वाटली आणि लगोलग तो मेल वाचायला घेतला. पण मग लगेचच का नाही बघितला याचा पश्चाताप झाला.
त्या मेल मध्ये आपण सर्वानीच शाळेत केलेल्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे पावसाळ्यात डबक्यातल्या पाण्यात होड्या सोडणं आणि तेच पाणी एकमेकांच्या अंगावर उडवणं,बर्फाचा गोळा खाणं,शिक्षा म्हणून अंगठे धरून उभं राहणं,गोट्या खेळणं आणि बरंच काही जे आपण सगळ्यांनीच शाळेत केलंय (आता काही असे महाभाग पण असतील ज्यांना या सगळ्या गोष्टीसाठी आपला हेवा वाटेल .)
आणि मग मन काय एकीकडे कामात तर दुसरीकडे शाळेत जाऊन बसलं त्या लाकडी बाकावर.
आजही आठवतोय मला माझ्या बालवाडीचा पहिला दिवस, माझी बालवाडी एका मंदिरात असायची.आईने सांगितल्याप्रमाणे मी भोकाड पसरून ते सगळ मंदिर डोक्यावर घेतलं होतं. त्या देवाने पण नक्की कानात बोटे घातली असतील. पण नंतर मला ती शाळा फार आवडायला लागली. आमच्या पेंडसे बाई फार छान होत्या.अजूनही भेटायला गेले त्यांना कि जुन्या आठवणी निघतात. मी जवळ जवळ रोज त्यांचा मार खायचे कारण रोज कुणाला तरी मारायचे. मग आई शाळेतून घ्यायला आली कि बाई तिच्याकडे तक्रार  करायच्या आणि मग काय विचारता, मग घरी गेल्यावर पुहा बाबांचा ओरडा ज्याची मला सवय झाली होती.
पण त्यांच्यामुळे मला गोष्टींचे भारी वेड लागले. त्या रोज एक नवी गोष्ट सांगायच्या. मला आजही प्रश्न पडतो किती मोठा खजिना होता त्यांच्याकडे रामायण, महाभारत्पासून,चिऊ काऊ , सगळे प्राणी पक्षी,परी, राजा राणी सगळा काही. आणि प्रत्येक गोष्टी नाधून एक शिकवण. श्रीगणेशा शिकले तो त्यांच्याकडेच अन खरंच आयुष्यातला पहिला गुरु मला भेटला.
पण एकाच वर्षाची बालवाडी आणि निरोपाचा क्षण आला. त्या दिवशी आईने मला सांगितले कि आता तू या शाळेत जायचं अन्ही दुसरी शाळा . मला खूप रडू आला मला माझ्या आवडत्या बाईना सोडून जायचं नव्हतं . तेव्हापासून आजपर्यंत कुणाला निरोप द्यायचा म्हटलं कि जीवावर येतं, आपोआप अश्रू डोळ्यात साठतात.
नंतर माझी शाळा होती "नगरपरिषद शाळा क्रमांक 4 मुलींची शाळा" ती पण छान होती सगळे शिक्षक खूप छान होते . इथे मला खरी वाचनाची गोडी लागली. कारण सगळ्या बाईंना माहित होते कि मला वाचायला आवडते मग त्या मला नेहमी पुस्तक वाचायला द्यायच्या. इथे एक कोडं होता ज्याचं उत्तर मला आजही गवसलं नाहीये तो म्हणजे एकदाही अभ्यास न करता नेहमी माझा पहिला नंबर यायचा.
असो, आज खरच वाटतंय पुन्हा शाळेत जावं, पावसात भिजावं सगळ्या सवंगड्यासोबत, तो बर्फाचा गोळा फस्त करावा सगळ्यात आधी कोण संपवतय याची शर्यत लावून...
15 ऑगस्ट, 26 जानेवारी या दिवसाचं महत्व हल्ली वाटत कारण सुट्टी मिळते म्हणून पण शाळेत असताना त्या दिवशी सगळ्यात आधी कोण तयार होतंय यावरून एकमेकांना चिडवता यायचं. कॉलेजला गेल्यावर सुरवातीची दोन वर्षे ती सुट्टी हवीशी वाटली पण नंतर ती नकोशी वाटू लागली आणि शाळेतल्या जेवढ्या मित्र मैत्रीणीना शक्य आहे तेवढ्यांनी शाळेत जायचं ठरवलं दोन्ही पैकी एका तरी दिवशी. शाळेत गेलो कि मग सगळे दिवस पुन्हा आठवू लागायचे.
पण या वेळी ते शक्य नाही याच सतत वाईट वाटतंय कारण एकतर मित्र मैत्रिणी पण भेटणार नाहीत शाळा पण नाही अन शिक्षक पण नाही.
खरच मला पुन्हा शाळेत जायचं लहान होऊन. होता येईल. या क्षणी मला तो अल्लौद्दीनाचा दिवा भेटावा मी त्याला नक्की मागेन कि मला पुन्हा लहान कर आणि माझ्या शाळेत नेऊन बसव।.

मिळेल का मला तो दिवा??????


Wednesday, July 21, 2010

fituri

फितुरी

धुंद सारी पावसाच्या
घेऊन जातात कधी मला
आठवणींच्या गावाला
जिथे दूरपर्यंत माळरानाच
आहे माझ्या साथीला

धुंद सारी पावसाच्या
बरसतात तुझ्याचसारख्या
कधी अखंड अविरत
तुझेच शब्द होऊन
अन कधी नुसताच
बोलावं नयनांतून

धुंद सारी पावसाच्या
ज्यांच्यासाठी
चातक झालाय आतुर
माझ्याचसारखा
अन माझे शब्दही
झालेत तुझेच फितूर

धुंद सारी पावसाच्या
हल्ली नकोशाच वाटतात
येण्याचे वाचन देऊन
ऐनवेळी घात करतात
खरच का रे त्याही
तुझीच फितुरी करतात?